Translate

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

कोस्टा रीका ....... दिल की नज़र से !

         तसं पाहायला गेलं तर, मी कोस्टा रीकाला जाण्याचा योग हा योगायोगानंच माझ्या भ्रमण क्षेत्रात आला असं म्हणावं लागेल. माझ्या संशोधन कार्याच्या निमित्ताने जर्मनी, स्वीडन आणि पनामा मध्ये बरीच फिरले. पनामामधे आणि कोस्टा रीकामधे UK student व्हिसा असल्यास सहा महिन्याचा On entry व्हिसा मिळतो. माझे पनामा मधले काम लांबले आणि म्हणून व्हिसा सुद्धा वाढवावा लागला. हातात वेळ कमी असल्यामुळे एक सोप्पा उपाय म्हणजे जवळच्या दुसऱ्या देशात जाऊन परत येणे; म्हणजे आठवडाभर राहून परत आल्यावर On entry  परत नवीन व्हिसा मिळतो. आणि ह्याच निमित्ताने माझ्या पासपोर्टवर सुद्धा कोस्टा रीकाचा शिक्का बसला. तशी मी काही प्रवासावेडी व्यक्ती नाही आणि ट्रिप म्हंटलं की नातेवाईकांचा आणि मित्र-मैत्रिणींचा मोठ्ठा ग्रुप हेच डोक्यात येतं. मला एकटीने प्रवास करायला अजिबात आवडत नाही, पण गरज आहे आणि पर्याय नाही म्हटल्यावर ' आलिया भोगासी .. ' च्या वाटेवर चालू पडले. तिकडच्या काही स्थानिक मित्रांना विचारलं तेव्हा कळलं की Puerto Viejo ( पुएर्तो व्हिओ ) हे कोस्टा रिका मधील एकदा तरी पाहावं असं टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. तिथे विद्यार्थ्यांना राहायला परवडतील अशी हॉस्टेल सारखी हॉटेल्स आहेत आणि मुळात सुरक्षित आहे. तशी, मी माझं आठवड्याचं काम सुद्धा एक दिवस बसून प्लॅन करणारी मुलगी आहे. पण तेव्हा काय मनात आलं  कुणास ठाऊक; बसचं तिकिटंही आधी नं काढता बॅग भरली आणि निघाले....... Bag packing through Costa Rica !
           पनामामधे मी Gamboa ( गॅम्बोआ ) नावाच्या गावात राहत होते. Gamboa ते पनामा सिटी एक बस, पनामा सिटी ते पनामा बॉर्डर जवळच्या गावापर्यंत दुसरी बस, त्या गावापासून बॉर्डर पर्यंत टॅक्सी आणि क्रॉस केल्यावर पुएर्तो व्हिओ पर्यंत तिसरी बस.... असा जवळ जवळ २७ तासांचा प्रवास मी अनोळखी भाषा, नवीन लोक आणि सातासमुद्रापार असलेल्या देशांमध्ये कसा केला ह्याचं मला अजूनही कधी कधी आश्चर्य वाटतं ! पण हे शक्य झालं ते केवळ त्या देशातल्या मोठं मन आणि दिलखुलास मिजास असलेल्या लोकांमुळे..... माझे तीनही बस प्रवास मी गप्पा मारत मारत म्हणजेच dumb-charades खेळत खेळत केले... आणि प्रत्येक ठिकाणी मला कुणी ना कुणी मदत करायला होतंच ! तसे त्या २७ तासांमधले ४ तास माझे बॉर्डर वरच्या ऑफिसरना माझी केस समाजवण्यातच गेले. भारतीय मुलगी, भारतीय पासपोर्ट, UK व्हिसा + युरोपियन व्हिसा + एक आधीच असलेला पानामाचा On entry व्हिसा ....
बॉर्डर वरील मोडकळीस आलेला ब्रिज 
हे सगळं समीकरण त्यांना समजावून सांगता सांगता माझे ४ तास खर्ची पडले ! त्या बॉर्डरवर पनामा आणि कोस्टा रीकाच्या मधे एक अत्यंत मोडकळीस आलेला लाकडी पूल आहे, जो फक्त चालत पार करता येऊ शकतो. तो क्रॉस केला की आपण दुसऱ्या देशात पोचतो. तो ब्रिज बघता कुणालाही वाटणार नाही की याच्या दोन टोकाला दोन वेगळे देश आहेत. पण पनामा नंतर कोस्टा रीका पाहताना मात्र मला प्रकर्षाने जाणवलं की पनामापेक्षाही कोस्टा रीका जास्तं सुंदर आहे. शहरीकरणाचा जो हात सध्या पानामावरून फिरू पाहतो आहे तो सुदैवाने अजूनतरी कोस्टा रीका पासून लांब आहे. पुएर्तो व्हिओ बॉर्डर पासून जरा लांबच आहे, म्हणजे बसने जवळ जवळ दोन-अडीच तास लागतात. Puerto viejo किंवा Puerto viejo de talamanca हे समुद्रकिनारी वसलेलं एक छोटंसं गावच आहे. मुळात कोस्टा रीका हा देशच इतका छोटा आहे की गाडीने एका दिवसात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सहज जात येईल.
Puerto Viejo मधील रम्य निळाशार समुद्र किनारा ! 

           बसमधून पुएर्तो व्हिओला उतरल्यावर माझ्या दोन छोट्या बॅगा सावरत सावरत हॉटेल शोधायला निघाले. बुकिंग तर केलंच नव्हतं आणि विद्यार्थी दशेत असल्याने पाकीट सुद्धा जरा हलकच होतं. सगळ्यात पहिल्यांदा स्टुडंट हॉस्टेल पाहिलं आणि गेल्या पावली बाहेर आले. तसं काही वाईट नव्हतं, पण तिथे शांतता मिळाली असती असं काही वाटलं नाही. मग वाटेत दिसेल त्या प्रत्येक हॉटेल मध्ये चौकशी करायला सुरुवात केली. पण एकही हॉटेल परवडेल अशा रेंजमधे येत नव्हतं. एक-दोन चकरा मारल्यावर एका हॉटेलच्या बाहेर विचार करत उभी होते. थोड्या वेळात एक आफ्रिकन काका बाहेर आले. त्यांनी मला माझा प्रॉब्लेम विचारला, आणि मीही सरळ सरळ सांगितलं, 'हॉस्टेलमध्ये राहण्याची इच्छा नाही आणि हॉटेलमध्ये राहण्याइतके पैसेही नाहीत !' त्यावर ते म्हणाले, "चल, मी तुला एक छोटी रूम देतो, तुला जितके जमतील तितके पैसे तू मला दे !". मला खूप आश्चर्य वाटलं, माझ्याशी काहीही देणं-घेणं नसताना त्यांनी माझी मदत का केली? मनात आलेले नकोसे विचार मागे टाकल्यावर वाटलं, कदाचित आपल्याप्रमाणे त्यांच्याकडेही 'अतिथी देवो भव !' ही म्हण प्रचलित असावी. सगळ्या सुविधा असलेली एक छोटीशी खोली त्यांनी मला बहाल केली. हॉटेलचं नाव होतं, हॉटेल अगापी !!
लाटा अंगावर झेलत उभा असलेला खडक 
एक छोटं टुमदार हॉटेल, हॉटेलचं मागचं गेट ओलांडून गेलं की लगेच समुद्र ! त्या समुद्रकिनाऱ्यावरून समुद्राच्या मधोमध तप करायला उभा राहिल्यासारखा एक भव्य खडक समुद्राच्या लाटा अंगावर झेलत उभा असलेला दिसायचा. ते पाहून शांता शेळकेंची कविता परत मनात उमटून गेली..
निळा निळा समुद्र आणि बेट पाचूचे मधे ..
तिथेच मी, तिथेच मी मनात कोणीसे वदे !




त्याचं ते रूप पाहून आणि समुद्राची ती अथांग गाज ऐकून स्वतःच्या खुजेपणाची जाणीव प्रकर्षाने होत होती. बॅगा रूमवर टाकून मी समुद्रावर गेले आणि ती समुद्राची गाज ऐकत एका खडकावर बसून राहिले. समोरच्या खडकांवर लाटा आवेशाने आदळत होत्या आणि प्रत्येक लाटेचा आदळताना आवाजही वेगळा येत होता, जणू ती प्रत्येक लाट त्या अथांग सागराच्या पोटातलं एक नवीन गुपित माझ्या कानात सांगत होती ! तो समुद्र, ती शांताता आणि मी असा पहिला दिवस कसा निघून गेला कळलंच नाही....
                पुएर्तो व्हीओमधील Jaguar Rescue Centre म्हणजे जंगलवेड्या सर्व व्यक्तींसाठी एक पर्वणीच ! माझ्या हॉटेलपासून जरा लांब असलं तरी मी चालत, हिंडत-फिरत, कोस्टा रीका बघत जायचं ठरवलं. चालता चालता मधूनच एक हाक ऐकू आली, "नमस्ते !!"..... मी चमकलेच .... कोस्टा रीकामधे ?? नमस्ते ??? वळून पाहिलं तर एक गृहस्थ रस्त्यापलीकडून माझ्या दिशेने हसत चालत येत होते. माणूस तर गोरा होता, पण चेहऱ्यावर मला वर्षानुवर्षे ओळखत असल्यासारखे स्मित ! मी पण सवयीने 'नमस्ते' म्हणाले.... माझं आश्चर्यात चिंब भिजलेलं 'नमस्ते' ऐकून आणि चेहऱ्यावर उमटलेली असंख्य प्रश्नचिन्हं बघून त्यांनीच खुलासा केला, "तुम्ही भारतीय ना ? मी लांबूनच ओळखलं तुम्हाला.. काय आहे, की मी कामानिमित्त अनेकदा भारतात राहून आलो आहे, त्यामुळे भारतीय व्यक्ती मी गर्दीतही अगदी सहज ओळखु शकतो !" त्यांचं नाव होतं ' इग्नाशिओ गिल ' ( Ignacio Gil ) ! मुळचे कोस्टा रिकन असलेलं, चाळीशीच्या आत-बाहेरचं, एक दिलखुलास व्यक्तिमत्व ! पहिली तोंडओळख झाल्यावर कळलं की त्यांची कोस्टा रीका आणि पनामामधे मिळून जवळ जवळ १०० एकरापेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे. काही जागांवर डेस्टिनेशन स्पेशल हॉटेल्स बांधली आहेत आणि तरी कोस्टा रीका मधली ४० एकराएवढी  जागा जंगल म्हणून राखीव ठेवली आहे. त्यांच्याकडे पाहून त्यांच्या श्रीमंतीचा अंदाजही कुणाला येणार नाही, उलट ते माझंच कौतुक जास्तं करत होते, की  मी घरापासून इतकी लांब शिक्षणासाठी राहते आणि इतक्या वेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेतेय. "तुला वेळ असेल तेव्हा सांग, मी तुला इकडचं जंगल दाखवतो !" या बोलीवर ई-मेल ची अदलाबदल करून मी पुढे निघाले.
               Jaguar Rescue Center ला पोचल्यावर कळलं कि तिथे हर प्रकारच्या प्राण्यांवरती उपचार केले जातात. अगदी ' स्लॉथ ' नावाच्या कासवापेक्षाही हळू चालणाऱ्या प्राण्यापासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या सापांपर्यंत !
कोस्टा रीका मधील प्रसिद्ध Golden eyelash viper
 आणि एकदा का हे प्राणी बरे झाले की त्यांना परत जंगलात सोडून दिले जाते. तिथे उपचार घेऊन बरी झालेली हरणं, वेगवेगळ्या जातीची माकडं अगदी मुक्तपणे विहरत होती. एक Toucan ( टुकन ) नावाचा पक्षी तर टूर गाईड सारखा पूर्ण वेळ आमच्या ग्रुपबरोबर फिरत होता. गाईड म्हणाला , की त्याला उडता येत नसल्याने तो कायम इथेच राहतो आणि येणाऱ्या लहान मुलांच्या खोड्या पण काढतो ! कोस्टा रीकाची संपूर्ण जैव-विविधता एकाच ठिकाणी पाहायची असेल तर या सेंटरला नक्की भेट द्यावी. माझा पूर्ण दिवस इथे कसा निघून गेला कळलंच नाही.
          
टूर गाईड म्हणून फिरणारा टूकन पक्षी  
 पुढचे दोन दिवस मात्र धो-धो पावसाने जाम गोची केली. बाहेर पडायची सोयच उरली नव्हती. मग काय, रूमवर तंगड्या पसरून पिक्चर बघत दोन दिवस काढावे लागले. तिसऱ्या दिवशी दुपारी मात्र देवाने फुंकर मारून ढग ढकलून द्यावेत तसे अचानक सगळे ढग संपावर गेले आणि अरुण महाराजांनी कृपा केली. ' आता आज फिरायला कुठे जावं ?' या विचारात असतानाच हॉटेलचे काका आले, " तुला कुणीतरी भेटायला आलंय !"... मला इथे कोण येणार भेटायला ?? बाहेर आले तर समोर Ignacio दत्त म्हणून उभे ! परवा बोलताना त्यांना कळलं होता मी कुठल्या हॉटेल मध्ये राहतेय, म्हणून ते सहज आले होते. म्हणाले, " जाऊया आज जंगल बघायला ?"........  अचानक माझ्यावर एक "मुलगी" म्हणून करण्यात आलेले "संस्कार" डोकं वर काढू लागले..... मी एकटी !.... अनोळखी देशात !.... बरोबर फोन पण नाही.... अशा परिस्थितीत, एका पूर्णपणे अनोळखी "पुरुषा" बरोबर ... मी जावं का बाहेर ??? हे रिस्की नक्कीच होतं, पण लहानपणापासून आईने मनातल्या आतल्या आवाजावर जास्तं विश्वास ठेवायला शिकवलं होता. ती म्हणायची, "आधी माणूस ओळखायला, वाचायला शिका... सगळ्या अपेक्षित-अनपेक्षित प्रश्नांची उत्तरं शोधून ठेवा... आणि मारा बिनधास्त उडी !" एक basic instinct होती आणि माणूस म्हणून Ignacio मला पटले होते. तरी, हॉटेलच्या काकांकडे Ignacio चा नंबर दिला, आई, ताई आणि परागला मेल करून कळवलं आणि निघाले. आणि माझा हा निर्णय अगदीच योग्य ठरला.
Coco Fruit

Poison Dart Frog
Ignacio च्या जंगलात आम्ही अनेक साप, Poison Dart Frogs ( एक प्रकारचे विषारी बेडूक ) आणि ज्यापासून चॉकलेट बनवतात ती Coco ची झाडे आणि फळे पहिली. तिथेच त्यांनी एक छोटंसं संगमरवरी मंदिर बांधलं होतं. आणि विचारत होते ... " बरोबर बांधलंय  ना मी ?" हे ऐकून, एक भारतीय म्हणून माझा उर अभिमानाने भरून आला.

जंगलातील साप दाखवणारे Ignacio Gil
आपली संस्कृती इतकी समृद्ध आहे की साता-समुद्रापल्याडच्या कोस्टा रीकन नागरिकालाही त्याची भुरळ पडावी. Ignacio नी मला त्यांच्या जंगलात तर फिरवलंच, शिवाय तिकडची प्रसिद्ध chocolate brownie सुद्धा घेऊन दिली. गाडीतून कोस्टा रीकाच्या एका बॉर्डर पर्यंत नेऊन आणलं, कुठल्या जागांवर फिरणं सुरक्षित नाही हे देखील सांगितलं आणि मग सुखरूप घरी सोडलं. मी रूमवर पोचून घरी कळवेपर्यंत आई, ताई, पराग आणि ते हॉटेलचे काकासुद्धा जरा टेन्शन मधेच होते. आणि माझा अनुभव ऐकून मात्र घरच्यांनी हातच टेकले. चौथा आणि शेवटचा दिवस माझा सगळ्यांसाठी चॉकलेटची खरेदी करण्यातच गेला. मग हॉटेलच्या काकांचा निरोप घेतला, Ignacio ना Thank you चे मेल केलं आणि बॅक तो पॅव्हेलियन ... सॉरी सॉरी .. पनामा !
               






हा संपूर्ण अनुभवच मला माणूस म्हणून समृद्ध करणारा ठरला. माणसांमधे माणूसपण अजूनही शिल्लक आहे, कदाचित माणूस म्हणून विश्वास ठेवायला आपणच कमी पडतो ! रंग-रूप आणि भाषेपल्याडच्या ह्या नात्यांची वीण माझ्या या प्रवासादरम्यान आणखीनच घट्ट होत गेली ! हि वीण यापुढेही अशीच पक्की राहावी हीच सदिच्छा ! सुदैवाने जर परत कोस्टा रीका पाहण्याची संधी मिळाली तर फिरण्यापेक्षा या जोडलेल्या माणसांना भेटायला मी आवर्जून जाईन.

- सोहिनी
           




मंगळवार, ३ डिसेंबर, २०१३

होळीचे रंग …… की रंगांची होळी !

      आपण सगळेच कायम ऐकत आलो आहोत, की एखादी गोष्ट आपल्यापासून लांब गेली की त्या गोष्टीची खरी किंमत कळते. आणि सगळ्यांनी हे कधी ना कधी अनुभवलेलं असेलंच. त्यातलीच एक आता मी पण आहे. चोवीस वर्ष भारतात राहूनही आपल्या सण-वारांपासून मी लांबच होते. 'आपले सण' हा निबंध लिहायला सांगितला, की रुक्षपणे काही माहितीपर शब्द एका पानावर खरडले जायचे. आता वाईट वाटतं, संस्कृतीने इतकी सुंदर, उबदार शाल या सणांच्या रूपाने आपल्याला पांघरली होती, पण तिचं महत्व नवीन कपडे आणि एका निबंधाइतकंच उरलं होतं. आपला देश सोडला आणि या थंड प्रदेशात त्या शालीचं महत्व खऱ्या अर्थाने कळलं. मग मोजकेच का असेना, पण आपली माणसं गोळा करून गणपती, गुढी-पाडवा, संक्रांत, होळी, दिवाळी, असे सगळे सण साता-समुद्रापारदेखील  रुजू लागले. Cambridge मध्ये गोळा झालेला सगळा नवीन गोतावळा सोडून, कामानिमित्त या वर्षी पनामा गाठलं आणि विणत आणलेली शाल पुन्हा उसवल्यासारखी वाटली. मग म्हटलं जाऊ दे , आपले सण या नव्या प्रदेशात नव्या अर्थाने शोधूया, नव्या चष्म्यातून पाहूया ! चष्मा बदलला आणि निसर्गात लपून बसलेले आपले सण उठून दिसायला लागले. अशीच ही माझी पक्षा-प्राण्यांबरोबर, झाडांबरोबर आणि माझ्या फुलपाखरांबरोबरची पहिली-वहिली होळी! 

जांभळा रंग ल्यालेले कृष्णकमळ

रंग माझा वेगळा, ढंग माझा वेगळा!


एकदा कामात मन रमलं की दिवस, आठवडे कसे निघून जातात कळतंच नाही. पानामामधे पहिले दोन महिने भुर्रकन उडून गेले. आजूबाजूला इतकं काही बघण्यासारखं होतं की 'कालनिर्णय' चाही विसर पडला होता. बघता बघता मार्च येउन ठेपला सुद्धा ! घरापासून ग्रीन-हाउस पर्यंतचा रस्ता म्हणजे पर्वणीच असायची. रमत-गमत, फोटो काढत, कामाच्या ठिकाणी वेळेत पोचत यावं म्हणून कितीही लवकर घर सोडलं, तरी अजून वेळ हवा होता असंच वाटायचं. २६ मार्चची सकाळ…… नेहमीप्रमाणे आवरून घर सोडलं. थोडसं चालून पुढे आलं की दाट जंगलाचा एक पट्टा रस्त्याच्या दोन्ही कडांना लागून होता आणि या जंगलात हिरवीगर्द झाडे दाटीवाटीने उभी होती. जरासा रस्ता सोडून पायवाटेने जंगलात शिरलं की टळटळीत ऊन्हंही सावल्यांमधे हरवून जायची. पानांचा रंगही अगदी गडद हिरवा, इतका, की पोपटही आपला पोपटी रंग या पानांत दडवू शकणार नाही. त्या दिवशी मात्र त्या रस्त्याच्या वळणावर आले, आणि थबकलेच ! त्या गर्द वनराईच्या मधोमध एक पिवळाजर्द मोठा ठिपका …… एक झाड आपल्या एकूणएका पानाचा त्याग करून, पिवळ्याधमक फुलांचा डोलारा सांभाळत उभं होतं… अगदी ऐटीत ! 

बहरलेल्या Guayacan चं पाहिलं दर्शन 

ह्या दृष्याचं पाहिलं दर्शनच एक स्मितलकेर चेहेऱ्यावर उमटवून गेलं आणि डोळ्यांनी टिपलेला तो प्रसन्न देखावा मनात खोलवर झिरपत गेला. मग अचानक आठवलं, कालपर्यंत तर या झाडाला एकही फुल नव्हतं …. मग एका रात्रीत असा काय चमत्कार घडला की संपूर्ण झाड फुलांनी बहरून गेलं.… जणू रात्री एखादी परी आपला पिवळा झगा या झाडाला घालून निघून गेली. थोडं पुढे चालून गेल्यावर असंच अजून एक झाड, गर्द हिरव्या वनराईत थाटात उभं होतं. जणू हळदीचा रंग ल्यालेली नवरी, हिरवा शालू नेसून, लाजत बोहल्यावर उभी आहे. 

हळदीने नटलेली नवरी!

चौकशी केल्यानंतर कळलं, की हे Guayacan नावाचं झाड आहे, जे याच दिवसात बहरतं. असं म्हणतात, की हे झाड आपल्या फुलांबरोबर पावसाचा निरोप घेऊन येतं …… कारण, हे साधारणपणे पाऊस सुरु व्हायच्या एक महिना आधी बहरतं. आणि नुसतं बहरत नाही तर संपूर्ण जंगलाला दागिन्यांनी नटवल्यासारखं सजवतं ! माझ्या तिथल्या मैत्रीणीच्याच शब्दात सांगायचं झालं तर, " Discovering a blooming Guayacan tree, is like finding a treasure in a forest !" 

पुढचे दोन दिवस अशीच ठिकठिकाणी ही फुलं फुलत होती. जरा उंचावरून पाहिलं की हिरव्या युनिफॉर्म घातलेल्या मुलांच्या गर्दीतून, पिवळी टोपी घालून आलेली खोडकर मुले डोकं वर काढतायत की काय, असा भास व्हायचा ! चौथ्या दिवशी अचानक हे पिवळे ठिपके त्या हिरव्या गर्दीत लुप्त झाले. जितके अचानक अवतरले, तितकेच अचानक गुडूप झाले.…. मागे उरलं …. एक ओकबोकं झाड ! मी कधी बहरलो होतो हे सांगत…… 

पिवळी टोपी घातलेली खोडकर मुले… :)

त्या रात्री बोलता बोलता आई म्हणाली, "तुझी आठवण काढत, होळीसाठी पुरणपोळी आणि कटाचं सार केलं होतं." …. आणि माझी ट्यूब  पेटली… अरेच्चा ! काल होळी होती नाही का ! आणि मग मनात विचार आला, निसर्गाला कसं कळलं, की बरोब्बर काल होळी होती? जणू ती रंगांची उधळण 'होली मुबारक' म्हणतच झाली होती. या निसर्गाला कशी कळते अचूक वेळ? मग माझा मलाच हसू आलं …. सण आपण निर्माण केले, निसर्गाकडे बघूनच केले, नाही का! होळीसाठीचे रंग आपण निसर्गाकडून घेतले ….  हा, आता ही गोष्ट वेगळी, की या होळीच्या नावाखाली आपणच आपला निसर्ग प्रदूषित करत आहोत, पाण्याचा अपव्यय करतो आहोत. या निसर्गाची सण साजरी करायची पद्धत पहा ना, किती निरुपद्रवी, तरी अत्यंत बोलकी ! हे जाणवलं  मात्र, आणि निसर्गाने त्याच्या प्रत्येक अंशात केलेली रंगांची उधळण प्रकर्षाने दिसून आली. काजूचा लालचुटुक रंग, कैरीचा आंबट हिरवा रंग, मावळतीचा शेंदरी सूर्य, तर पनामा कालाव्यातलं निळशार पाणी. मातीचा तपकिरी सुवास तर सोनटक्कयाचा श्वेतगंध …. आणि माझी फुलपाखरं तर काय, पंखावर इंद्रधनुष्य घेऊनच बागडत असतात. यादी न संपणाऱ्यातलीच आहे!
हे सगळं पाहता, एक प्रश्न मनात सतत घोळत राहतो…. जर आपण आपले सण निसर्गाकडून घेऊ शकतो, तर सण साजरा करायची पद्धत का नाही? या रंगांसाठी आपण होळी साजरी करतो, की होळीसाठी 'रंग उधळतो'? तुम्हाला तुमची खरी उत्तरं सापडली, तर बाकी कुणी जाऊ दे, पण स्वतःपाशी नक्की कबूल करा.





आणि या वेळी मला चक्क अजय-अतुलचं एक गाणं आठवलं ,

संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा !
जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा !
फुलाफुलांतून देतो, संदेश आम्हाला देवा,
ऋणी तुझे आम्ही फ़ुलराजा, धन्य झालो देवा !


- सोहिनी 

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१३

पनामामधले पहिले पाउल …….

          माझे सगळे मित्र-मैत्रिणी मला नेहमी म्हणतात, की ' तू खूप  lucky  आहेस '. कारण माझा शिक्षणाचं क्षेत्रच असं आहे की त्यानिमित्ताने मला खूप फिरता येतं … आणि मी ही त्यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे. चार वर्षांपूर्वी जर मला कुणी सांगितल असतं, की मी माझं, माझ्याभोवती निर्माण केलेलं छोटंसं जग मागे सोडून, बाहेरच्या देशात जाणार आहे, आणि इतकंच नाही तर दोन वर्षांच्या कालावधीतच चार भिन्न संस्कृती असलेले, भिन्न विचारसरणीचे देश 'पादाक्रांत' करणार आहे, तर मी त्या व्यक्तीलाच मुर्खात काढून मोकळी झाले असते. पण हे घडलं खरं ! कधी कधी अजूनही विश्वास बसायला वेळ लागतो. याबाबतीत मी नशीबवान ठरले, हे ही मला मान्य आहे. आमच्या प्रोजेक्ट मधले collaborators युरोपात ठिकठिकाणी विखुरलेले आहेत. शिवाय ज्या फुलपाखरांवर मी संशोधन करतेय ती मुळची मध्य-दक्षिण अमेरिकेत सापडतात. त्यामुळे कामानिमित्त मला फिरावं लागणार याची कल्पना होतीच. पण युरोपात फिराण्यापेक्षाही मला ओढ लागली होती ती पनामाची ! माझ्याबरोबर काम करणारे सगळे कधी ना कधी पनामाला कामानिमित्त जाउन आले होते, आणि त्या सर्वांकडून मी इतकं काही ऐकलं होतं कि माझीही उत्सुकता शीगेला पोचली होती. एकदाचा २०१३ चा जानेवारी उजाडला आणि माझा निघायचं दिवसही नक्की ठरला. तीन महिन्यांसाठी पनामामधला मुक्काम नक्की झाला. Cambridge मधला संसार गुंडाळला आणि २१ जानेवारीला पनामाच्या दिशेने कूच केलं. 

मी आणि प्रवास … आमचा अगदी ३६ चा आकडा आहे. आणि हेच सिद्ध करायला म्हणून कि काय, त्यादिवशी काळ्याकुट्ट ढगांनी संपूर्ण प्रदेश पांढराशुभ्र करायचा 'पण' केला. पाउस-वारा-गारा तर सोडाच हो …. ते परवडले असं म्हणावं लागेल, इतका त्यादिवशी हिमकणांनी थैमान घातला. अतिशय अद्ययावत समजली जाणारी UK ची दळण-वळणाची साधनेही त्या दिवशी ठप्प झाली. तशीही आपल्याकडे परंपराच आहे, एकतर प्रवासाला निघालेल्या माणसाला खूप सारे सल्ले आणि सूचना देऊन बेजार करायचं नाहीतर घाबरवून सोडायचं ! माझे भारतातले नातेवाईक कमी होते म्हणून कि काय माझ्या Cambridge मधल्या मित्र-मैत्रिणीनी ही त्यात भर घातली. विमान दुसऱ्या  दिवशी सकाळी निघणार होतं, पण माझा प्रवासाचा इतिहास बघता, घाबरून, मी आदल्या दिवशी दुपारीच Cambridge सोडलं. दोन ट्रेन आणि एक बस, अशी अदला-बदली करत, कसबसं लंडन गाठलं. रात्री दादाकडे राहायचं असं ठरलंच होतं, पण तिथे पोचेपर्यंत सुद्धा धीर निघत नव्हता. दोन अवजड bags आणि हिमकण साचून लाल झालेलं नाक सावरत सावरत जेव्हा मी त्याच्या घरी पोचले, तेव्हा माझी अवस्था बघण्यासारखी झाली होती. पांढऱ्याशुभ्र हिमाच्या गादीवरून ते सामान ओढत नेणं म्हणजे अगदी तारेवरची कसरत …. पण क्षणभर थांबून मागे वळून पाहिलं, तर त्या शुभ्रं गादीवर उमटलेले आपल्याच पायांचे ठसे आणि त्याला समांतर रुतलेले सामानाच्या चाकांचे tracks खूप लोभस दिसत होते. ही प्रवासाची तलवार डोक्यावर लटकत नसती ना, तर या थंड प्रदेशातला हा पांढरा उत्सवही खूप छान साजरा केला असता.…. पण असो ! तरी नशिबाने माझं विमान अगदी ठरल्या वेळी निघालं. 'Delayed' आणि 'Cancelled' च्या लाल यादीत माझ्या विमानासामोरचा 'On schedule' चा हिरवा दिवा मनातही हिरवळ निर्माण करणारा ठरला. पण अजूनही डोळ्यांसमोर पुढे २२ तासांचा प्रवास दिसत होता. विमानात असतानाही त्या जमिनीवरल्या मानवी दिव्यांच्या झगमगाटात मला पनामाची स्वप्न दिसत होती. कधी एकदा पोचतेय असं झालं होतं आणि या नादात धड झोपही लागली नाही. कप्तान साहेबांनी सूचना दिली, ' दोन तासांत आपण इष्टस्थळी पोचू! ' …… खाली पाहिलं तर समुद्राच्या निळ्याशार पाण्याव्यतिरिक्त काहीच नजरेस पडेना. शिवाय विमानाच्या खिडकीतून वाकूनही बघता येत नाही, त्यामुळे वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. जेव्हा त्या ' हवाई सुंदरीने '…. त्या विमानातल्या सुंदऱ्या खरच कौतुक करण्या इतक्या सुंदर होत्या, म्हणून हे शब्दप्रयोजन ! असो … तर जेव्हा तिने seat belt  लावण्याचा संकेत दिला, तेव्हा जाऊन कुठेतरी दूरवर, त्या समुद्राच्या मधोमध एक हिरवंगार बेट दृष्टीस पडलं आणि शांता शेळकेंची कविता आठवली …. 
                                                        
                                                    निळा निळा समुद्र आणि बेट पाचूचे मधे ,
                                                   तिथेच मी, तिथेच मी, मनात कोणीसे वदे !

जसजसे आम्ही जमिनीच्या जवळ येऊ लागलो तसतशा त्या हिरवाईत दडलेल्या रंगछटाही आणखी ठळक होऊ लागल्या. विमान जमिनीला टेकलं आणि माझ्या चेहेऱ्यावर एक मोठ्ठ smile उमटलं … अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंत !  बाहेर पाऊल टाकलं मात्रं …. आणि फ्रीझर मधून भट्टीत आल्यासारखं वाटलं. अंगावरच्या कपड्यांच्या तीन थरांचा एक झाला, तो ही नाईलाजाने, लोकलाजेस्तव ठेवावा लागला. पण तरीही , का कुणास ठाऊक? त्या हवेत श्वास घेतल्या क्षणी घरी आल्यासारखं वाटलं. पहिल्या नजरेतलं पनामा … खरतर पनामा सिटी म्हणजे दुसरी मुंबापुरीच वाटते. एका भागात अलिशान उंचच्या उंच इमारती, तर एका भागात गिरगावसारख्या चाळी, काही ठिकाणी पुलाच बांधकाम चालू, तर काही ठिकाणी मोठेच्या मोठे शॉपिंग मॉल …. मी Gamboa ला पोचेपर्यंत रात्र झाली होती. पण इतक्या २४ तासांच्या प्रवासानंतरही थकवा मात्र जाणवत नव्हता. पण तरी पाठ टेकल्या क्षणी इतकी शांत झोप लागली, जी मागच्या कैक महिन्यात मला मिळाली नव्हती. 
Gamboa मधलं माझं घर 
Golden aricari - posing for me in a window
पानामामधे Smithsonian Tropical Research Institute (STRI) चे र्रिसर्च सेंटर आहे. तिथल्या Gamboa नावाच्या गावी एक मुख्य  field research station आहे, जिथे आमच्या lab च्या स्वतःच्या insectaries आहेत. आजूबाजूला पसरलंय घनदाट जंगल, निरनिराळे रंग-बेरंगी जीव कुशीत घेऊन बसलेलं. हे Gamboa म्हणजे रानवेड्यांचं नंदनवनच जणू ! सकाळी जाग येत असे, ती पक्षांच्या किलबिलाटाने …… नव्हे, तर पोपटांच्या कर्कश्य गोंगाटाने ! Gamboa मधे राहायला मला छोटंसं टुमदार लाकडी घर मिळालं होतं. घराच्या मागच्या बाजूला संपूर्ण जंगल. तिथल्या एका झाडावर रोज संध्याकाळी हे पोपट झोपायला यायचे आणि उजाडता क्षणी अगदी आरडा-ओरडा करून उठवायचे. खिडकीत फक्त १० मिनिटं जरी उभं राहिलं, तरी किमान १० वेगवेगळ्या जातीचे प्राणी-पक्षी नजरेस यायचे. माझ्या घरापासून insectaries पर्यंत सकाळी चालत जाणे आणि रात्री उशिरा चालत परत येणे, हा माझ्या दिनक्रमातला अत्यंत आवडीचा भाग होता. कारण, दोन्ही वेळी मला रस्त्याच्या बाजूला किंवा रस्ता क्रॉस करताना अजब-गजब प्राणी, पक्षी, कीटक दिसायचे. सकाळी खूप पक्षी, Iguana (आकाराने मोठा असा एका प्रकारचा सरडा), फुलपाखरं दिसायची, तर रात्री घुबड, रातवा, विविध निशाचर,  काजवे यांची पर्वणी असायची. काजव्यांची स्पर्धा एकदा का सुरु झाली की तासच्यातास कसे निघून जायचे कळायचंही नाही. 
Iguana- Sitting on a lamp post on the road


Agouti in my backyard



Insectary च्या कोपऱ्यावर एक मोठ्ठ आंब्याचं झाड होतं आणि त्यालाच खेटून एक बकुळीच झाड …. येत्या येत्या त्या झाडावरच्या कैऱ्या तोडून खायच्या आणि रोज जाताना ओंजळभर बकुळीची फुलं घरी न्यायाची …. ह्याच साऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मी पनामाची कधी झाले ते माझं मलाच कळलं नाही. गेले होते तीन महिन्यांसाठी आणि परतले नउ महिन्यांनी , ह्यातच सगळं आलं , नाही का? या नऊ महिन्यात अतिशय सुंदर आणि कायम गाठीशी ठेवावे असे इतके अनुभव गोळा झालेत की ते एका लेखात सांगणे अवघड आहे …… म्हणूनच ……   
                                          
                                     " ये तो सिर्फ़ ट्रेलर था , पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ! "

- सोहिनी 

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१३

पावसास पत्र….

प्रिय पावसा, 

'पत्रास कारण की' ……. इतकी रुक्ष सुरुवात नाही करणार मी ! कारण आपलं नातंच खूप वेगळं आहे. इतकं आपलंसं, इतकं जुनं आणि तरीही नवीन अंकुराइतकं टवटवीत ! या नात्याला नाव देण्याचा अट्टाहास मी ही सोडून दिलाय. आपल्या चिंब ओल्या सरींमधे सगळी नाती एकवटून बसलेल्या तुला, अशा फुटकळ  'tagline' ची गरजच काय…. आणि तसही , आपल्या माणसांची आठवण यायला कारण कशाला लागतं, हो ना !

आठवतं, दरवर्षी भेटायला येण्यापूर्वी किती अधीर करायचास या मनाला …. ओढ , हुरहुर या शब्दांचे खरे अर्थ तू शिकवलेस, प्रेमात पडायच्याही आधी ! आणि आता, दोन वर्ष झाली, आपली भेटच झाली नाही. खूप आठवण येते रे तुझी …. आणि त्या आठवणींतही तू पूर्ण चिंब करतोस. पण तरी तहान मात्र भागत नाही. तुझ्याबरोबर घालवलेले सगळे क्षण एखाद्या चित्रपटासारखे उलगडत जातात. आपली पहिली भेट आठवते  तुला,  मला पहिल्यांदा बोट धरून डबक्यापर्यंत नेलेलस , दोन्ही हात धरून पाण्यात थपाक थपाक करायला शिकवलस, जोरात वीज कडाडली तेव्हा गच्चं मिठीत घेतलस …… तेव्हा घाबरले, ती पहिली आणि शेवटची ! नंतर मात्र हिरव्या निसर्गाचं माहेर झालं आणि काळ्याकुट्ट ढगातल्या पांढऱ्याशुभ्र विजेचा झाला ….  घराच्या अंगणातला उत्सव ! यायचास तेव्हा सगळं कसं स्वच्छं, सुंदर करायचास, पाना-फुलांमधे असा मिसळायचास की त्यांच्यातलाच एक होऊन जायचास, मातीला भेटायला यायचास आणि मातीचं गुपित वाऱ्याच्या कानात अलगद सांगायचास ……. अजूनही तसाच आहेस ना ?

तुझे दूरचे नातेवाईक येतात मला Cambridge मधे भेटायला. पण कुणालाच तुझी 'सर' नाही रे ! Cambridge मधला पाऊस म्हणजे अगदी इथल्या लोकांसारखाच , धीर-गंभीर ! बरसतानाही अगदी विचार करून संयमाने पडणारा. तरीही इथे पूर येतो हे नवलंच ! अल्लड सरी , उधाण वारा म्हणजे यांच्यासाठी नाविन्यपूर्ण गोष्टी आणि चर्चेचा विषय ! चिखलाच्या डबक्यात नाचणारी पोरं , हातात हात घालून आपल्याच धुंदीत चाललेलं नवतरुण जोडपं, स्वप्नाळलेल्या डोळ्यांवर, भरारी घेऊ पाहणाऱ्या हातांवर, अलगद थेंब  झेलणारी अल्लद मनं, पाहिलीच नाहीत मी इथे ! अर्थात, यात इथल्या पावसाचा तरी काय दोष म्हणा, ' जसा देश, तसा वेश' या म्हणीचं तो फक्त पालन करतो. 
मागच्या वर्षीचा जून आठवतो तुला? तुझ्याशिवायाचा माझा पहिला पावसाळा! आणि पावसाळा कसला, इथे 'पावसाळा' असा ऋतू पण नाही. पण जून उजाडला आणि एक अनामिक हुरहुर लागली. लक्षात आलं , या वर्षी आपली भेट नाही! खूप कसनुसं झालं, आणि … आणि बाहेर बघते तर काय…. विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासकट तू धो-धो कोसळत होतास. तुझ्या अशा रुपाची सवय नसलेल्या समस्त मंडळींची अगदी तारांबळ उडाली होती. BBC वर पण तुझीच चर्चा पुढे कित्येक दिवस चालू होती.  त्यांना थोडीच माहिती होतं की तू फक्तं मला भेटायला आलेलास! जेव्हा आई मला फोनवर म्हणाली की ' पाण्यावाचून तिथे सगळ्यांचे हालहाल होताहेत ' तेव्हा अथक मिन्नतवारीने तुला परत पाठवावं लागलं होतं !

पण पुढच्या वर्षी असं करू नकोस हं ! जितकी ओढ तुझी मला आहे , त्यापेक्षा कित्तीतरी जास्तं गरज तुझी माझ्या मातीला आहे. तिची जळजळ नाही बघवणार मला …… आणि तुलाही ! तूच मला निसर्गाच्या इतक्या जवळ नेलंस, ह्या निसर्गाने घातलेल्या कोड्यांची उत्तरं शोधायलाच मी साता-समुद्रापार आलेय. नवीन वाट धरली आहे, ती परतून येण्यासाठीच ! काही वर्षात परत भेट होईलच की आपली ….  मग मला तू आहेस आणि तुला मी ! आणि या वर्षी तर मी तुझ्या पनामामधल्या भावाला सुद्धा भेटले. तो जरासा रागीट आहे , पण मन तुझ्याच सारखं आहे रे त्याचं …. तसं जमलं आमचं छान आणि यापुढेही नक्की जमेल ! तू मात्र मी मागे सोडून आलेल्या माझ्या माणसांना आणि माझ्या मातीला वाट पाहायला लावू नकोस हं … शेवटी दर वर्षी , तुझ्या प्रत्येक थेंबातून मीच भेटते रे त्यांना! 

तुझीच,
सोहिनी  

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

घास घे रे फुलपाखरा!

घास घे रे तान्ह्या बाळा,
घास चिऊ काऊचा,
घास एक गाईचा,
घास वेड्या राघूचा …घास घे!

लहानपणापासुनच 'बाळाचं जेवण' हा समस्त आई वर्गाच्या नाकी नऊ आणणारा आणि तरीही जिव्हाळ्याचा असा विषय! लहानपणापासून - असं  म्हणण्याचा कारण म्हणजे, हा विषय खरतरं बाळाच्या वयाशी निगडीत नसतोच मुळी …. तो बाळाचा 'बाळ्या' होऊन अगदी 'बाळोबा' होईपर्यंत तितकाच महत्वाचा राहातो. फक्त त्या काळजीच स्वरूप बदलत राहात. बाळाच्या जेवणात चिऊ-काऊ पासून सगळे प्राणीमात्र गोळा झालेले असतात, जे कालांतराने पुसट होत जातात. मला मात्र या प्राणिमात्रांची संगत पुन्हा मिळाली. पण यावेळी घास मी भरवत होते!

गडबडलात ना? खरं सांगायचं तर मला कळल्यावर मी ही गडबडलेच जराशी …… त्याचं  असं आहे ना, की मी सध्या फुलपाखरांवर संशोधन करायला, त्यांचा अभ्यास करायला Cambridge University  मधे असते. इथे आल्यापासूनच प्रत्येक टप्प्यावर मी एक नवी गोष्ट शिकतेय. त्यातलीच ही एक…… 'फुलपाखरांना जेऊ घालणे' . संशोधनासाठी लागणारी फुलपाखरं आमची आम्हीच वाढवतो. त्यामुळे त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवं नको ते बघणं, त्यांना खाऊ-पिऊ घालणं, त्यांची काळजी घेणं हे ओघाने आलंच ! तसा या फुलपाखरांचा आमच्याकडे बराच राजेशाही थाट असतो बरं का! त्यांना राहायला साजेसं हवामान असलेली वेगळी खोली, अळ्यांच्या आवडीची झाडं  आणि फुलपाखरांसाठी साखरेचं पाणी अगदी खास डीशमधे सजवून दिलं जातं. त्यांच्यासाठी रंगीत स्ट्रो चा गुच्छा, फुलांच्या आकारात सजवून दिला जातो. आम्ही त्याला  'feeders' म्हणतो. इतकच नाही तर पहिल्यांदा जेव्हा फुलपाखरू कोशातून बाहेर येतं, तेव्हा त्याला खायला कुठे ठेवलं आहे हे माहिती नसतं, त्यांना आम्हाला पहिला घास स्वतःच भरवावा लागतो. कधी कधी अगदी जबरदस्तीने! पण एकदा त्यांना कळलं कि नंतर स्वतःच शोधतात. तशी त्यांच्या मदतीला पिंजऱ्यातली इतर फुलपाखरं असतातंच…… एकमेकांचं  बघून ही पटकन शिकतात, अगदी लहान मुलांप्रमाणेच! 
Feeders
 खरंच, ही फुलपाखरं लहान मुलांसारखीच असतात. त्यांचीही काळजी आपण आपल्या पिल्लांची घेतो तशीच घ्यावी लागते. ह्यांच्या तऱ्हा  आणि नखरेही अगदी लहान मुलांसारखेच सांभाळावे लागतात. याची प्रचीती मला आधीच जरी आली असली तरी वेगवेगळे अनुभव अगदी आजपर्यंत  येतातच आहेत. वर्षभरापूर्वी  मला माझ्या supervisor ने सांगितलं  की मला माझ्या कामाचा काही भाग पूर्ण   करायला  स्वीडनला जावं लागणार आहे. हे सांगताच त्याचा पुढचा प्रश्न आला, "किती फुलपाखर आहेत सध्या आपल्याकडे? म्हणजे घेऊन जाण्याईतपत आहेत ना?" मी चाटच पडले …… घेऊन जाण्याईतपत म्हणजे? मी फुलपाखरं माझ्या बरोबर न्यायची? ती ही जिवंत? कसं शक्य आहे? ……. माझे प्रश्न माझ्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना कळले असावेत. ते हसले, म्हणाले, " किती आहेत ते मोजून सांग, पुढच्या गोष्टी मी स्वतः येउन दाखवतो!" 
प्रवासात फुलपाखरांना एका कागदी पाकिटात घेऊन जायचं होतं. पाकिटात खाली एक ओलसर कापसाचा बोळा ठेवला, उबदार ओलेपणा टिकवण्यासाठी आणि फुलपाखरं  जशी फुलांवर बसतात, त्या स्थितीतच त्यांना आत ठेवलं. पाकिटात आतल्या-आत ती गोलगोल फिरतात आणि मग त्यांचे पंख खराब होतात. तसं  होऊ नये, म्हणून पंखांवर नाही पण पंखांच्या अगदी वरती एक पिन लावली …… आणि फुलपाखरं  विमानात बसायला तय्यार! लहानपणी ऐकलेल्या कवितेच्या ओळी मनात एकदम चमकून गेल्या…… 
' एकदा एक फुलपाखरू नटून-थटून,
सफारीला निघाले विमानात बसून,
एवढ्याश्या फुलपाखराचे एवढेसे सामान,
दोन-चार फुलं आणि एकच-एक पान! '

ही माझ्या बालपणीची सगळ्यात आवडती कविता, आणि आज मी या ओळी प्रत्यक्षात जगात होते!

स्वीडनला माझं सगळं काम फुलपाखरांवरच अवलंबून होतं. त्यामुळे, फुलपाखरे जगली तरच काम होणार. फुलपाखरांना राहायला ऐसपैस मोठी खोली नसेल तर पाकिटातच ती जास्त छान राहतात असं  मला सांगितलं होतं, पण ते काही केल्या माझ्या मनाला पटत  नव्हतं. पण स्वीडनला पोचले आणि याची प्रचीती मला स्वतःलाच आली. पाकिटात ती जास्तं खुश दिसत होती. मग त्यांना 'भरवणं' हा माझ्या दिनक्रमाचा एक महत्वाचा भाग झाला. रोज एकेका फुलपाखराला पाकिटातून बाहेर काढायचं आणि त्याची सोंड (proboscis) उलगडून साखरेच्या पाण्यात बुडवायची. मग त्यांना कळतं कि इथे खाऊ ठेवलाय. भूक लागली असेल तर ती स्वतःची स्वतः, फडफड न करता, उडून न जाता, शांत बसून पितात. 
Feeding session in progress!
हे सगळ करताना प्रत्येक क्षणी मला हेच जाणवत होतं, की ही माझी फुलपाखरं, खरंच, अगदी लहान मुलं आहेत!  जशा लहान मुलांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या निरनिराळ्या तऱ्हा  असतात, तशा ह्यांच्याही आहेत. आपण म्हणतो, कि सामान्यपणे मुली जरा जास्त समंजस आणि स्थिर असतात. तर मुलं खोडकर आणि चुळ्बुळी ! हे बहुतेक फुलपाखरांच्या बाबतीतही लागू असावं. कारण, बहुतेक female फुलपाखरं खायला कुठे आहे हे कळलं कि लगेच शांत व्हायची. पण male फुलपाखरांना शांत बसवून खाऊ घालताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत होती. पण यातही अपवाद होतेच! काही females इतक्या चंचल की दर वेळी जबरदस्तीने पकडून ठेवावं लागत होतं , जोपर्यंत त्यांचं पोट खरच भरत नाही तोपर्यन्त. तर काही males इतकी गुणी की जणू 'आआमु' (आईचा आज्ञाधारक मुलगा) असावा ! काही वेळा काही फुलपाखरे मेल्याचं नाटक करतात आणि पकड सोडताच उडून जातात. मग सुरु होतो पकडा-पकडीचा खेळ! आता कळतंय, जेव्हा आई आपल्यामागे ताट घेऊन धावायची, तेव्हा तिची किती दमछाक होत असेल. 
Me.. with my Butterflies!
ह्यांच्या खाण्याच्या तऱ्हाही एकसे बढकर एक बरं का! कुणी प्रत्येक घोट चवीचवीने घेतं , तर कुणी हावरटासारखं  बकाबका पितं. कुणी कधी कधी ठसका लागल्यागत मधेच पितापिता गडबडतही , तर कुणी अगदीच गुणी बाळासारखं पोट भरल, की उडून बाजूला होतं. काहींना 'आपल्याला भूक लागली आहे' हे कळायलाच वेळ लागतो, तर काहींना 'आपलं पोट आता भरलंय' हेच मुळी कळत नाही. मग बसून राहतात उगाच सोंड बुडवून तशीच! ……… पण जेव्हा त्यांना मनभरून पिताना बघते ना, तेव्हा तेच समाधान मिळतं जे एका आईला आपल्या पिल्लांना पोटभर जेऊ घातल्यावर मिळतं. नंतर नंतर तर माझ्या फुलपाखरांनाही मी खायला कधी देते हे कळायला लागलं होतं. मी पाकीट हातात घेतलं की ती जिभल्या चाटायला लागायची! 
Butterfly feeding with proboscis!
हे सारे अनुभव मला फक्त आत्तासाठी नव्हे तर आयुष्यभर पुरे पडतील असेच आहेत. मी या सगळ्या गोष्टी इथे येउन, एका प्रचंड अनुभवी माणसाकडून, माझ्या supervisor कडून शिकू शकले याचा मला खूप आनंद आहे. …… आणि तुम्ही या गोष्टी घरी करण्याचा प्रयत्न करणार नाही... याची खात्रीही! आपण सगळे तितके सुजाण आहातच,         नाही का ! 

- सोहिनी