Translate

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१३

पावसास पत्र….

प्रिय पावसा, 

'पत्रास कारण की' ……. इतकी रुक्ष सुरुवात नाही करणार मी ! कारण आपलं नातंच खूप वेगळं आहे. इतकं आपलंसं, इतकं जुनं आणि तरीही नवीन अंकुराइतकं टवटवीत ! या नात्याला नाव देण्याचा अट्टाहास मी ही सोडून दिलाय. आपल्या चिंब ओल्या सरींमधे सगळी नाती एकवटून बसलेल्या तुला, अशा फुटकळ  'tagline' ची गरजच काय…. आणि तसही , आपल्या माणसांची आठवण यायला कारण कशाला लागतं, हो ना !

आठवतं, दरवर्षी भेटायला येण्यापूर्वी किती अधीर करायचास या मनाला …. ओढ , हुरहुर या शब्दांचे खरे अर्थ तू शिकवलेस, प्रेमात पडायच्याही आधी ! आणि आता, दोन वर्ष झाली, आपली भेटच झाली नाही. खूप आठवण येते रे तुझी …. आणि त्या आठवणींतही तू पूर्ण चिंब करतोस. पण तरी तहान मात्र भागत नाही. तुझ्याबरोबर घालवलेले सगळे क्षण एखाद्या चित्रपटासारखे उलगडत जातात. आपली पहिली भेट आठवते  तुला,  मला पहिल्यांदा बोट धरून डबक्यापर्यंत नेलेलस , दोन्ही हात धरून पाण्यात थपाक थपाक करायला शिकवलस, जोरात वीज कडाडली तेव्हा गच्चं मिठीत घेतलस …… तेव्हा घाबरले, ती पहिली आणि शेवटची ! नंतर मात्र हिरव्या निसर्गाचं माहेर झालं आणि काळ्याकुट्ट ढगातल्या पांढऱ्याशुभ्र विजेचा झाला ….  घराच्या अंगणातला उत्सव ! यायचास तेव्हा सगळं कसं स्वच्छं, सुंदर करायचास, पाना-फुलांमधे असा मिसळायचास की त्यांच्यातलाच एक होऊन जायचास, मातीला भेटायला यायचास आणि मातीचं गुपित वाऱ्याच्या कानात अलगद सांगायचास ……. अजूनही तसाच आहेस ना ?

तुझे दूरचे नातेवाईक येतात मला Cambridge मधे भेटायला. पण कुणालाच तुझी 'सर' नाही रे ! Cambridge मधला पाऊस म्हणजे अगदी इथल्या लोकांसारखाच , धीर-गंभीर ! बरसतानाही अगदी विचार करून संयमाने पडणारा. तरीही इथे पूर येतो हे नवलंच ! अल्लड सरी , उधाण वारा म्हणजे यांच्यासाठी नाविन्यपूर्ण गोष्टी आणि चर्चेचा विषय ! चिखलाच्या डबक्यात नाचणारी पोरं , हातात हात घालून आपल्याच धुंदीत चाललेलं नवतरुण जोडपं, स्वप्नाळलेल्या डोळ्यांवर, भरारी घेऊ पाहणाऱ्या हातांवर, अलगद थेंब  झेलणारी अल्लद मनं, पाहिलीच नाहीत मी इथे ! अर्थात, यात इथल्या पावसाचा तरी काय दोष म्हणा, ' जसा देश, तसा वेश' या म्हणीचं तो फक्त पालन करतो. 
मागच्या वर्षीचा जून आठवतो तुला? तुझ्याशिवायाचा माझा पहिला पावसाळा! आणि पावसाळा कसला, इथे 'पावसाळा' असा ऋतू पण नाही. पण जून उजाडला आणि एक अनामिक हुरहुर लागली. लक्षात आलं , या वर्षी आपली भेट नाही! खूप कसनुसं झालं, आणि … आणि बाहेर बघते तर काय…. विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासकट तू धो-धो कोसळत होतास. तुझ्या अशा रुपाची सवय नसलेल्या समस्त मंडळींची अगदी तारांबळ उडाली होती. BBC वर पण तुझीच चर्चा पुढे कित्येक दिवस चालू होती.  त्यांना थोडीच माहिती होतं की तू फक्तं मला भेटायला आलेलास! जेव्हा आई मला फोनवर म्हणाली की ' पाण्यावाचून तिथे सगळ्यांचे हालहाल होताहेत ' तेव्हा अथक मिन्नतवारीने तुला परत पाठवावं लागलं होतं !

पण पुढच्या वर्षी असं करू नकोस हं ! जितकी ओढ तुझी मला आहे , त्यापेक्षा कित्तीतरी जास्तं गरज तुझी माझ्या मातीला आहे. तिची जळजळ नाही बघवणार मला …… आणि तुलाही ! तूच मला निसर्गाच्या इतक्या जवळ नेलंस, ह्या निसर्गाने घातलेल्या कोड्यांची उत्तरं शोधायलाच मी साता-समुद्रापार आलेय. नवीन वाट धरली आहे, ती परतून येण्यासाठीच ! काही वर्षात परत भेट होईलच की आपली ….  मग मला तू आहेस आणि तुला मी ! आणि या वर्षी तर मी तुझ्या पनामामधल्या भावाला सुद्धा भेटले. तो जरासा रागीट आहे , पण मन तुझ्याच सारखं आहे रे त्याचं …. तसं जमलं आमचं छान आणि यापुढेही नक्की जमेल ! तू मात्र मी मागे सोडून आलेल्या माझ्या माणसांना आणि माझ्या मातीला वाट पाहायला लावू नकोस हं … शेवटी दर वर्षी , तुझ्या प्रत्येक थेंबातून मीच भेटते रे त्यांना! 

तुझीच,
सोहिनी  

५ टिप्पण्या: