Translate

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

कोस्टा रीका ....... दिल की नज़र से !

         तसं पाहायला गेलं तर, मी कोस्टा रीकाला जाण्याचा योग हा योगायोगानंच माझ्या भ्रमण क्षेत्रात आला असं म्हणावं लागेल. माझ्या संशोधन कार्याच्या निमित्ताने जर्मनी, स्वीडन आणि पनामा मध्ये बरीच फिरले. पनामामधे आणि कोस्टा रीकामधे UK student व्हिसा असल्यास सहा महिन्याचा On entry व्हिसा मिळतो. माझे पनामा मधले काम लांबले आणि म्हणून व्हिसा सुद्धा वाढवावा लागला. हातात वेळ कमी असल्यामुळे एक सोप्पा उपाय म्हणजे जवळच्या दुसऱ्या देशात जाऊन परत येणे; म्हणजे आठवडाभर राहून परत आल्यावर On entry  परत नवीन व्हिसा मिळतो. आणि ह्याच निमित्ताने माझ्या पासपोर्टवर सुद्धा कोस्टा रीकाचा शिक्का बसला. तशी मी काही प्रवासावेडी व्यक्ती नाही आणि ट्रिप म्हंटलं की नातेवाईकांचा आणि मित्र-मैत्रिणींचा मोठ्ठा ग्रुप हेच डोक्यात येतं. मला एकटीने प्रवास करायला अजिबात आवडत नाही, पण गरज आहे आणि पर्याय नाही म्हटल्यावर ' आलिया भोगासी .. ' च्या वाटेवर चालू पडले. तिकडच्या काही स्थानिक मित्रांना विचारलं तेव्हा कळलं की Puerto Viejo ( पुएर्तो व्हिओ ) हे कोस्टा रिका मधील एकदा तरी पाहावं असं टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. तिथे विद्यार्थ्यांना राहायला परवडतील अशी हॉस्टेल सारखी हॉटेल्स आहेत आणि मुळात सुरक्षित आहे. तशी, मी माझं आठवड्याचं काम सुद्धा एक दिवस बसून प्लॅन करणारी मुलगी आहे. पण तेव्हा काय मनात आलं  कुणास ठाऊक; बसचं तिकिटंही आधी नं काढता बॅग भरली आणि निघाले....... Bag packing through Costa Rica !
           पनामामधे मी Gamboa ( गॅम्बोआ ) नावाच्या गावात राहत होते. Gamboa ते पनामा सिटी एक बस, पनामा सिटी ते पनामा बॉर्डर जवळच्या गावापर्यंत दुसरी बस, त्या गावापासून बॉर्डर पर्यंत टॅक्सी आणि क्रॉस केल्यावर पुएर्तो व्हिओ पर्यंत तिसरी बस.... असा जवळ जवळ २७ तासांचा प्रवास मी अनोळखी भाषा, नवीन लोक आणि सातासमुद्रापार असलेल्या देशांमध्ये कसा केला ह्याचं मला अजूनही कधी कधी आश्चर्य वाटतं ! पण हे शक्य झालं ते केवळ त्या देशातल्या मोठं मन आणि दिलखुलास मिजास असलेल्या लोकांमुळे..... माझे तीनही बस प्रवास मी गप्पा मारत मारत म्हणजेच dumb-charades खेळत खेळत केले... आणि प्रत्येक ठिकाणी मला कुणी ना कुणी मदत करायला होतंच ! तसे त्या २७ तासांमधले ४ तास माझे बॉर्डर वरच्या ऑफिसरना माझी केस समाजवण्यातच गेले. भारतीय मुलगी, भारतीय पासपोर्ट, UK व्हिसा + युरोपियन व्हिसा + एक आधीच असलेला पानामाचा On entry व्हिसा ....
बॉर्डर वरील मोडकळीस आलेला ब्रिज 
हे सगळं समीकरण त्यांना समजावून सांगता सांगता माझे ४ तास खर्ची पडले ! त्या बॉर्डरवर पनामा आणि कोस्टा रीकाच्या मधे एक अत्यंत मोडकळीस आलेला लाकडी पूल आहे, जो फक्त चालत पार करता येऊ शकतो. तो क्रॉस केला की आपण दुसऱ्या देशात पोचतो. तो ब्रिज बघता कुणालाही वाटणार नाही की याच्या दोन टोकाला दोन वेगळे देश आहेत. पण पनामा नंतर कोस्टा रीका पाहताना मात्र मला प्रकर्षाने जाणवलं की पनामापेक्षाही कोस्टा रीका जास्तं सुंदर आहे. शहरीकरणाचा जो हात सध्या पानामावरून फिरू पाहतो आहे तो सुदैवाने अजूनतरी कोस्टा रीका पासून लांब आहे. पुएर्तो व्हिओ बॉर्डर पासून जरा लांबच आहे, म्हणजे बसने जवळ जवळ दोन-अडीच तास लागतात. Puerto viejo किंवा Puerto viejo de talamanca हे समुद्रकिनारी वसलेलं एक छोटंसं गावच आहे. मुळात कोस्टा रीका हा देशच इतका छोटा आहे की गाडीने एका दिवसात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सहज जात येईल.
Puerto Viejo मधील रम्य निळाशार समुद्र किनारा ! 

           बसमधून पुएर्तो व्हिओला उतरल्यावर माझ्या दोन छोट्या बॅगा सावरत सावरत हॉटेल शोधायला निघाले. बुकिंग तर केलंच नव्हतं आणि विद्यार्थी दशेत असल्याने पाकीट सुद्धा जरा हलकच होतं. सगळ्यात पहिल्यांदा स्टुडंट हॉस्टेल पाहिलं आणि गेल्या पावली बाहेर आले. तसं काही वाईट नव्हतं, पण तिथे शांतता मिळाली असती असं काही वाटलं नाही. मग वाटेत दिसेल त्या प्रत्येक हॉटेल मध्ये चौकशी करायला सुरुवात केली. पण एकही हॉटेल परवडेल अशा रेंजमधे येत नव्हतं. एक-दोन चकरा मारल्यावर एका हॉटेलच्या बाहेर विचार करत उभी होते. थोड्या वेळात एक आफ्रिकन काका बाहेर आले. त्यांनी मला माझा प्रॉब्लेम विचारला, आणि मीही सरळ सरळ सांगितलं, 'हॉस्टेलमध्ये राहण्याची इच्छा नाही आणि हॉटेलमध्ये राहण्याइतके पैसेही नाहीत !' त्यावर ते म्हणाले, "चल, मी तुला एक छोटी रूम देतो, तुला जितके जमतील तितके पैसे तू मला दे !". मला खूप आश्चर्य वाटलं, माझ्याशी काहीही देणं-घेणं नसताना त्यांनी माझी मदत का केली? मनात आलेले नकोसे विचार मागे टाकल्यावर वाटलं, कदाचित आपल्याप्रमाणे त्यांच्याकडेही 'अतिथी देवो भव !' ही म्हण प्रचलित असावी. सगळ्या सुविधा असलेली एक छोटीशी खोली त्यांनी मला बहाल केली. हॉटेलचं नाव होतं, हॉटेल अगापी !!
लाटा अंगावर झेलत उभा असलेला खडक 
एक छोटं टुमदार हॉटेल, हॉटेलचं मागचं गेट ओलांडून गेलं की लगेच समुद्र ! त्या समुद्रकिनाऱ्यावरून समुद्राच्या मधोमध तप करायला उभा राहिल्यासारखा एक भव्य खडक समुद्राच्या लाटा अंगावर झेलत उभा असलेला दिसायचा. ते पाहून शांता शेळकेंची कविता परत मनात उमटून गेली..
निळा निळा समुद्र आणि बेट पाचूचे मधे ..
तिथेच मी, तिथेच मी मनात कोणीसे वदे !
त्याचं ते रूप पाहून आणि समुद्राची ती अथांग गाज ऐकून स्वतःच्या खुजेपणाची जाणीव प्रकर्षाने होत होती. बॅगा रूमवर टाकून मी समुद्रावर गेले आणि ती समुद्राची गाज ऐकत एका खडकावर बसून राहिले. समोरच्या खडकांवर लाटा आवेशाने आदळत होत्या आणि प्रत्येक लाटेचा आदळताना आवाजही वेगळा येत होता, जणू ती प्रत्येक लाट त्या अथांग सागराच्या पोटातलं एक नवीन गुपित माझ्या कानात सांगत होती ! तो समुद्र, ती शांताता आणि मी असा पहिला दिवस कसा निघून गेला कळलंच नाही....
                पुएर्तो व्हीओमधील Jaguar Rescue Centre म्हणजे जंगलवेड्या सर्व व्यक्तींसाठी एक पर्वणीच ! माझ्या हॉटेलपासून जरा लांब असलं तरी मी चालत, हिंडत-फिरत, कोस्टा रीका बघत जायचं ठरवलं. चालता चालता मधूनच एक हाक ऐकू आली, "नमस्ते !!"..... मी चमकलेच .... कोस्टा रीकामधे ?? नमस्ते ??? वळून पाहिलं तर एक गृहस्थ रस्त्यापलीकडून माझ्या दिशेने हसत चालत येत होते. माणूस तर गोरा होता, पण चेहऱ्यावर मला वर्षानुवर्षे ओळखत असल्यासारखे स्मित ! मी पण सवयीने 'नमस्ते' म्हणाले.... माझं आश्चर्यात चिंब भिजलेलं 'नमस्ते' ऐकून आणि चेहऱ्यावर उमटलेली असंख्य प्रश्नचिन्हं बघून त्यांनीच खुलासा केला, "तुम्ही भारतीय ना ? मी लांबूनच ओळखलं तुम्हाला.. काय आहे, की मी कामानिमित्त अनेकदा भारतात राहून आलो आहे, त्यामुळे भारतीय व्यक्ती मी गर्दीतही अगदी सहज ओळखु शकतो !" त्यांचं नाव होतं ' इग्नाशिओ गिल ' ( Ignacio Gil ) ! मुळचे कोस्टा रिकन असलेलं, चाळीशीच्या आत-बाहेरचं, एक दिलखुलास व्यक्तिमत्व ! पहिली तोंडओळख झाल्यावर कळलं की त्यांची कोस्टा रीका आणि पनामामधे मिळून जवळ जवळ १०० एकरापेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे. काही जागांवर डेस्टिनेशन स्पेशल हॉटेल्स बांधली आहेत आणि तरी कोस्टा रीका मधली ४० एकराएवढी  जागा जंगल म्हणून राखीव ठेवली आहे. त्यांच्याकडे पाहून त्यांच्या श्रीमंतीचा अंदाजही कुणाला येणार नाही, उलट ते माझंच कौतुक जास्तं करत होते, की  मी घरापासून इतकी लांब शिक्षणासाठी राहते आणि इतक्या वेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेतेय. "तुला वेळ असेल तेव्हा सांग, मी तुला इकडचं जंगल दाखवतो !" या बोलीवर ई-मेल ची अदलाबदल करून मी पुढे निघाले.
               Jaguar Rescue Center ला पोचल्यावर कळलं कि तिथे हर प्रकारच्या प्राण्यांवरती उपचार केले जातात. अगदी ' स्लॉथ ' नावाच्या कासवापेक्षाही हळू चालणाऱ्या प्राण्यापासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या सापांपर्यंत !
कोस्टा रीका मधील प्रसिद्ध Golden eyelash viper
 आणि एकदा का हे प्राणी बरे झाले की त्यांना परत जंगलात सोडून दिले जाते. तिथे उपचार घेऊन बरी झालेली हरणं, वेगवेगळ्या जातीची माकडं अगदी मुक्तपणे विहरत होती. एक Toucan ( टुकन ) नावाचा पक्षी तर टूर गाईड सारखा पूर्ण वेळ आमच्या ग्रुपबरोबर फिरत होता. गाईड म्हणाला , की त्याला उडता येत नसल्याने तो कायम इथेच राहतो आणि येणाऱ्या लहान मुलांच्या खोड्या पण काढतो ! कोस्टा रीकाची संपूर्ण जैव-विविधता एकाच ठिकाणी पाहायची असेल तर या सेंटरला नक्की भेट द्यावी. माझा पूर्ण दिवस इथे कसा निघून गेला कळलंच नाही.
          
टूर गाईड म्हणून फिरणारा टूकन पक्षी  
 पुढचे दोन दिवस मात्र धो-धो पावसाने जाम गोची केली. बाहेर पडायची सोयच उरली नव्हती. मग काय, रूमवर तंगड्या पसरून पिक्चर बघत दोन दिवस काढावे लागले. तिसऱ्या दिवशी दुपारी मात्र देवाने फुंकर मारून ढग ढकलून द्यावेत तसे अचानक सगळे ढग संपावर गेले आणि अरुण महाराजांनी कृपा केली. ' आता आज फिरायला कुठे जावं ?' या विचारात असतानाच हॉटेलचे काका आले, " तुला कुणीतरी भेटायला आलंय !"... मला इथे कोण येणार भेटायला ?? बाहेर आले तर समोर Ignacio दत्त म्हणून उभे ! परवा बोलताना त्यांना कळलं होता मी कुठल्या हॉटेल मध्ये राहतेय, म्हणून ते सहज आले होते. म्हणाले, " जाऊया आज जंगल बघायला ?"........  अचानक माझ्यावर एक "मुलगी" म्हणून करण्यात आलेले "संस्कार" डोकं वर काढू लागले..... मी एकटी !.... अनोळखी देशात !.... बरोबर फोन पण नाही.... अशा परिस्थितीत, एका पूर्णपणे अनोळखी "पुरुषा" बरोबर ... मी जावं का बाहेर ??? हे रिस्की नक्कीच होतं, पण लहानपणापासून आईने मनातल्या आतल्या आवाजावर जास्तं विश्वास ठेवायला शिकवलं होता. ती म्हणायची, "आधी माणूस ओळखायला, वाचायला शिका... सगळ्या अपेक्षित-अनपेक्षित प्रश्नांची उत्तरं शोधून ठेवा... आणि मारा बिनधास्त उडी !" एक basic instinct होती आणि माणूस म्हणून Ignacio मला पटले होते. तरी, हॉटेलच्या काकांकडे Ignacio चा नंबर दिला, आई, ताई आणि परागला मेल करून कळवलं आणि निघाले. आणि माझा हा निर्णय अगदीच योग्य ठरला.
Coco Fruit

Poison Dart Frog
Ignacio च्या जंगलात आम्ही अनेक साप, Poison Dart Frogs ( एक प्रकारचे विषारी बेडूक ) आणि ज्यापासून चॉकलेट बनवतात ती Coco ची झाडे आणि फळे पहिली. तिथेच त्यांनी एक छोटंसं संगमरवरी मंदिर बांधलं होतं. आणि विचारत होते ... " बरोबर बांधलंय  ना मी ?" हे ऐकून, एक भारतीय म्हणून माझा उर अभिमानाने भरून आला.

जंगलातील साप दाखवणारे Ignacio Gil
आपली संस्कृती इतकी समृद्ध आहे की साता-समुद्रापल्याडच्या कोस्टा रीकन नागरिकालाही त्याची भुरळ पडावी. Ignacio नी मला त्यांच्या जंगलात तर फिरवलंच, शिवाय तिकडची प्रसिद्ध chocolate brownie सुद्धा घेऊन दिली. गाडीतून कोस्टा रीकाच्या एका बॉर्डर पर्यंत नेऊन आणलं, कुठल्या जागांवर फिरणं सुरक्षित नाही हे देखील सांगितलं आणि मग सुखरूप घरी सोडलं. मी रूमवर पोचून घरी कळवेपर्यंत आई, ताई, पराग आणि ते हॉटेलचे काकासुद्धा जरा टेन्शन मधेच होते. आणि माझा अनुभव ऐकून मात्र घरच्यांनी हातच टेकले. चौथा आणि शेवटचा दिवस माझा सगळ्यांसाठी चॉकलेटची खरेदी करण्यातच गेला. मग हॉटेलच्या काकांचा निरोप घेतला, Ignacio ना Thank you चे मेल केलं आणि बॅक तो पॅव्हेलियन ... सॉरी सॉरी .. पनामा !
               


हा संपूर्ण अनुभवच मला माणूस म्हणून समृद्ध करणारा ठरला. माणसांमधे माणूसपण अजूनही शिल्लक आहे, कदाचित माणूस म्हणून विश्वास ठेवायला आपणच कमी पडतो ! रंग-रूप आणि भाषेपल्याडच्या ह्या नात्यांची वीण माझ्या या प्रवासादरम्यान आणखीनच घट्ट होत गेली ! हि वीण यापुढेही अशीच पक्की राहावी हीच सदिच्छा ! सुदैवाने जर परत कोस्टा रीका पाहण्याची संधी मिळाली तर फिरण्यापेक्षा या जोडलेल्या माणसांना भेटायला मी आवर्जून जाईन.

- सोहिनी
           
७ टिप्पण्या:

 1. अतिशय ओघवती शैली आणि समर्पक छायाचित्रे. वाचायला मजा आली... विशेषतः माणुसकीवर भाष्य करणारा शेवट लेखाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो.

  उत्तर द्याहटवा
 2. It is outstanding. An start to end journey of yours will motivate and help the upcoming around you.

  उत्तर द्याहटवा
 3. सोनू,मस्त..फारच छान लिहले आहेस..परत एकदा त्या सगळ्या क्षणांना भेटून आले..

  उत्तर द्याहटवा
 4. सोनू,मस्त..फारच छान लिहले आहेस..परत एकदा त्या सगळ्या क्षणांना भेटून आले..

  उत्तर द्याहटवा